Mumbai Pune Express : पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वर वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मार्गावरील वाढत्या गर्दीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उरण–कर्जत–शिरूर महामार्गाच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या महिन्यात एक्सप्रेसवेवर सुमारे 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी तासन् तास अडकून पडले. सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला येथे कोंडी होणे आता नेहमीचे झाले आहे. त्यामुळे पुणे–मुंबई दरम्यान एकाच मार्गावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सुमारे 135 किलोमीटर लांबीचा शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण असा चारपदरी मल्टिनोडल कॉरिडॉर प्रस्तावित आहे. हा मार्ग सुरू झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. औद्योगिक भागांतील मालवाहतूक थेट उरण बंदराशी जोडली गेल्यास मोठी सोय होईल.
मात्र हा प्रकल्प अद्याप मंजुरी आणि अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर या पर्यायी मार्गाबाबत प्रशासन लवकर निर्णय घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




