पुणे: आज आकाशात एक अद्भूत खगोलीय (Chandra Grahan) घटना घडणार आहे. 2026 सालातील पहिले चंद्रग्रहण आज होत असून, अवकाशात तांबूस रंगाचा ‘रक्तचंद्र’ पाहायला मिळणार आहे. विज्ञानाच्या दृष्टीने ही एक सावल्यांचा खेळ असणारी घटना असली, तरी भारतीय संस्कृतीत याला मोठे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे.

जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. यंदाचे हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होत आहे.
भारतात वेळ काय?
भारतीय प्रमाणवेळेनुसार, ग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होईल. मात्र, त्यावेळेस भारतात सूर्यप्रकाश असल्याने आपल्याला हे ग्रहण दिसणार नाही. भारतात चंद्रोदय संध्याकाळी 6:26 ते 6:32 च्या सुमारास होईल. ग्रहण 6:46 वाजता संपणार आहे. याचाच अर्थ, भारतीयांना केवळ 15 ते 20 मिनिटांसाठीच या खगोलीय घटनेचा अनुभव घेता येईल.
शास्त्रांनुसार, ग्रहणाचा काळ हा बदलांचा काळ मानला जातो. या काळात ‘सुतक’ पाळण्याची परंपरा आहे. सुतक म्हणजे असा काळ जो शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो.
-
काय करावे?: या काळात ईश्वराचे चिंतन, मंत्र जप आणि ध्यान करणे लाभदायक मानले जाते.
-
काय टाळावे?: ग्रहण काळात भोजन करणे, स्वयंपाक करणे किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.







