इराण: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी (Khamenei’s Death) यांचा अंत हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नसून, इस्रायल आणि अमेरिकेने गेल्या दोन दशकांपासून रचलेल्या एका चक्रव्यूहाचा परिणाम आहे. इस्रायलने तेहरानमधील संपूर्ण ट्रॅफिक कॅमेरा यंत्रणा अनेक वर्षांपूर्वीच हॅक केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, खामेनींच्या निवासाबाहेर तैनात असलेले कॅमेरेच त्यांच्या हालचालींची माहिती थेट इस्रायली सर्व्हरला पुरवत होते. याद्वारे खामेनी कधी बाहेर पडतात, त्यांच्या ताफ्यात किती गाड्या असतात आणि सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी कधी बदलतात, याचा ‘पॅटर्न ऑफ लाईफ’ डेटा तयार करण्यात आला होता. एका इस्रायली अधिकाऱ्याच्या मते, “आम्हाला तेहरानची गल्ली न गल्ली जेरुसलेमसारखी तोंडपाठ होती.”

तेहरानच्या ज्या ‘पास्टर स्ट्रीट’ला जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात होते, तिथे हल्ले झाले. दरम्यान, याची धक्कादायक ‘इनसाईड स्टोरी’ आता समोर आली आहे.
केवळ कॅमेरेच नाही, तर अमेरिकन सीआयएने (CIA) इराणमध्ये खबरीही पाठवले होते. ज्या क्षणी खामेनी एका ठराविक ठिकाणी असल्याची खात्री पटली, त्याचवेळी परिसरातील मोबाईल टॉवर्स जॅम करण्यात आले. त्यानंतर सुरू झाला ६० सेकंदांचा थरार. इस्रायली विमानांनी 30 क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या संरक्षण यंत्रणेला सावरण्याची संधीही मिळाली नाही.
या ऑपरेशनने सिद्ध होते की, आता युद्धे केवळ सीमेवर नाही, तर डेटा, एआय (AI) आणि सायबर घुसखोरीच्या जोरावरही जिंकली जाऊ शकतात.






