Crime News: लातूर: शहरातील भांबरी चौक परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शेजाऱ्याला जाब विचारल्याच्या रागातून एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत आईसह दोन मुले गंभीर जखमी झाली असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

महादेव-पार्वतीनगर भागात राहणारे बालाजी सोमवंशी यांनी शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे याला घरासमोर आरडाओरड व शिवीगाळ करू नका, असे सांगितले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या कांबळे याने अचानक चाकू काढून बालाजी यांच्या पोटात वार केला. हा प्रकार पाहून त्यांचा भाऊ नागेश सोमवंशी भांडण सोडवण्यासाठी पुढे आला. मात्र आरोपीने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.
दोन्ही मुलांना जखमी अवस्थेत पाहून आई चंद्रकला सोमवंशी त्यांना वाचवण्यासाठी धावल्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांत त्याला अटक केली. या प्रकरणी लातूर एमआयडीएसी पोलीस स्टेशन येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






