पुणे, ता. ३ : वाढती वाहनसंख्या, सततची वाहतूक कोंडी (Pune News) आणि कामावर वेळेत पोहोचण्याची घाई, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यात एक अत्यंत धोकादायक प्रवृत्ती डोके वर काढताना दिसत आहे. रुग्णवाहिकेला मार्ग देण्याऐवजी तिच्याच पाठीमागे चारचाकी व दुचाकींच्या रांगा लावून भरधाव वेगाने पुढे जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी घेतलेला हा ‘शॉर्टकट’ जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव मात्र कमीच दिसते.

पुण्यातून पुणे-सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, सातारा आणि मुंबई हे प्रमुख महामार्ग जातात. याशिवाय सासवड आणि मुळशीकडे जाणारे राज्यमार्गही मोठ्या प्रमाणात वाहनांनी गजबजलेले असतात. सकाळ-संध्याकाळची कोंडी ही आता नित्याची बाब झाली आहे. अशा वेळी सायरन वाजवत जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकेला बाजू देताना काही चालक तिच्या मागेच सरकून स्वतःचा मार्ग मोकळा करून घेतात. ही प्रवृत्ती केवळ बेजबाबदार नाही, तर अत्यंत धोकादायक आहे.
रुग्णवाहिका अचानक ब्रेक लावल्यास किंवा वळण घेतल्यास मागील वाहनांची धडक होण्याची शक्यता प्रचंड असते. वेग, कमी अंतर आणि घाई या त्रिसूत्रीमुळे अपघाताचा धोका अनेकपटींनी वाढतो. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे रुग्णवाहिकेला मोकळी जागा न मिळाल्यास रुग्णाच्या उपचारात विलंब होतो. आणि तो विलंब जीवघेणा ठरू शकतो.
वाहतुकीचे नियम रुग्णवाहिकेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सांगतात. तिच्या पाठीमागे वेगाने जाण्याची परवानगी देत नाहीत. तरीही काही चालक नियमांची पायमल्ली करून स्वतःच्या सोयीसाठी इतरांच्या जीवाशी खेळ करताना दिसतात. ही मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना या धोकादायक प्रवृत्तीचे परिणाम समजावून सांगितले पाहिजेत. रुग्णवाहिकेला सुरक्षित आणि मोकळा मार्ग मिळणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भविष्यातील मोठी दुर्घटना टाळायची असेल, तर आजच कठोर पावले उचलावी लागतील. कारण वेळ वाचवण्याच्या नादात जर एखादा जीव गेला, तर त्याची भरपाई कोण करणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते आहे.
संयम हाच खरा उपाय
काही क्षणांची घाई आयुष्यभराच्या पश्चात्तापाचे कारण बनू शकते. रुग्णवाहिका म्हणजे कोणाचातरी शेवटचा आशेचा किरण असतो. तिच्या पाठीमागे धावणे म्हणजे त्या आशेवरच गदा आणणे होय. सुरक्षित अंतर ठेवणे, सिग्नल पाळणे आणि रुग्णवाहिकेला पूर्ण मार्ग मोकळा करून देणे. ही प्रत्येक चालकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. खरी सामाजिक जाणीव म्हणजे दुसऱ्याच्या जीवाला प्राधान्य देणे.
पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी
रुग्णवाहिकेच्या पाठीमागे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होत आहे. काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी नियमांची उघड पायमल्ली केली जात आहे. अशा नियमभंग करणाऱ्या चालकांवर तात्काळ दंडात्मक तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रमुख महामार्ग आणि शहरातील चौकांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोषींना ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.







