अक्षय टेमगिरे

Mahashivratri : शिरूर : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त पिंपरी दुमाला येथील प्राचीन सोमेश्वर मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.
दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर प्रशासनाने शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था केली आहे. पाच पांडवकालीन स्थापनेचा वारसा लाभलेल्या या प्राचीन मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील तसेच दूरवरूनही शिवभक्त मोठ्या श्रद्धेने येथे उपस्थित राहतात.
पहाटे महाभिषेक, रुद्राभिषेक तसेच विशेष पूजाविधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. दिवसभर भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमत आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरात पाहायला मिळत आहे.






