भिगवण (प्रतिनिधी) दि.१५

Bhigawan : भिगवण व परिसरात मटका-जुगार, अवैध हातभट्टी दारू विक्री आणि देहविक्रीचे जाळे पुन्हा एकदा मजबूत झाल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे. मात्र या सर्व प्रकारांवर स्थानिक पोलिसांची ठोस कारवाई दिसून न आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी मदनवाडी परिसरातील एका लॉजवर पुणे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्या कारवाईदरम्यान काही तरुणींची सुटका करण्यात आली होती. ही कारवाई बाहेरील पथकाकडून झाली; मग स्थानिक स्तरावर अशी कारवाई का होत नाही? हा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
दरम्यान, मटका व्यवसायाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. व्हॉट्सअॅपवरून आकडे स्वीकारले जात असून ऑनलाईन व्यवहारातून “एक मेसेज आणि मटका फिक्स” अशी सोय उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरबसल्या जुगार खेळण्याची सुविधा वाढली असून हा अवैध धंदा अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे.
अवैध हातभट्टी दारू विक्रीही काही भागांत उघडपणे सुरू असल्याचे आरोप आहेत. काही ठिकाणी खुलेआम व्यवहार होत असतानाही कारवाई होत नसल्याने “नेमके संरक्षण कुणाचे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
भिगवण परिसरात अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे? स्थानिक पोलिसांची भूमिका नेमकी काय? आणि या सर्वामागे काही आर्थिक गणित दडले आहे का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
आता तरी संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेऊन कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.







