संतोष मुंडे

पुणे: पुण्यासह राज्यभरातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाड्यांची घोषणा केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) एकत्र निवडणूक लढणार असल्याने पक्ष श्रेष्ठींसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद दिसून येत आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेची चर्चा फिस्कटल्याने शिंदेंच्या सेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदेंचे कार्यकर्ते पुण्यात एकटे पडल्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे. तर मुंबई महानगर पालिकेत भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार असल्याचे आता निश्चित झाले असून जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने ते आनंदी आहेत; तर अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे राज्यभरातील महापालीकांमधील इच्छुक उमेदवारांमध्ये ‘कही ख़ुशी कही गम’ ची भावना असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात शरद पवारांनी राष्ट्रावादी (अजित पवार) यांच्यासोबत एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीला पवारांनी धोका दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेसह कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे सेना पुण्यात एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंची सेना, कॉंग्रेस, मनसे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील युतीची चर्चा निष्फळ ठरली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप पक्षश्रेष्ठी आणि शिंदे सेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, नेते रवींद्र धंगेकर यांच्यात चर्चा होणार होती. या चर्चेसाठी उद्योगमंत्री उदय सामंतही ऊपस्थित राहणार होते. मात्र ते येण्यागोदरच शहराध्यक्ष नाना भानगिरे, नेते रवींद्र धंगेकर दोघेही बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याने ही चर्चा निष्फळ ठरल्याचं समोर आलं आहे. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पक्ष 15 जागांवर लढणार असल्याचे म्हटले होते. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला होता. याच मुद्द्यावरून वातावरण तापले आणि अखेर धंगेकर बैठक अर्धवट सोडून निघून गेले. यामुळे शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
या नाट्यमय घडामोडींनंतर, रवींद्र धंगेकर नाराज असल्याची माहिती समोर आली. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. यानंतर धंगेकर राष्ट्रवादीकडून आपला मुलगा प्रणव धंगेकरांच्या उमेदवारीबाबत बोलले असल्याची चर्चा होत आहे. मात्र आपली अशी कोणतीची चर्चा झाली नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
मुंबईत, शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मनसेला विरोध असल्याने मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले आहे. मात्र, पुण्यात भाजपने आपले उमेदवार जाहीर करत ‘एबी’ फॉर्म दिले आहेत. यामुळे शिंदे सेना आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र दुसून येत आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपत जोरदार राडा झाला. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपशी युती तुटल्याचे जाहीर केले. तर नाशिकमध्ये भाजप इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने मोठा राडा केला. इच्छुक उमेदवारांनी थेट ‘एबी’ फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याचे दिसून आले.
राज्यातील इतर महापालिकांमध्येही शिवसेना-भाजप युतीमध्ये मोठा राडा झालेला दिसून येत आहे. कुठे मारहाण, कुठे आत्मदहन तर कुठे एबी फॉर्म घेऊन पळून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी पक्षासाठी अनेक वर्षांपासून काम केल्यानंतरही तिकीट न मिळाल्याने उमेदवार रडतानाही दिसून आले. एकीकडे हे चित्र असताना मुंबईत मात्र, एकनाथ शिंदे वाटाघाटीत यशस्वी ठरले आहेत.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 90 जागा पदरात पाडून घेण्यात एकनाथ शिंदेंना यश आले आहे. तर ठाण्यात दोघांनीही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातील महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये ‘कही गम कही ख़ुशी’ असल्याचे दिसून आले.






