विशाल शिंदे

पुणे: राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली–सिंहगड या डोंगराळ व वनसंपन्न परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार पुन्हा एकदा उफाळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पानशेत रस्त्यालगत असलेल्या राजगड तालुक्यातील ओसाडे परिसरात दुर्मीळ चौसिंगा हरणाची बंदुकीने गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चार शिकाऱ्यांना राजगड तालुका वन विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
विशेष म्हणजे, शिकारीनंतर हरणाच्या मांसाची वाटणी सुरू असतानाच वन विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. नववर्षाच्या सुरुवातीलाच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या पानशेत–सिंहगड परिसरात हा प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रविवारी (दि. २८) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास राजगड वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र निंबोरे हे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात गस्तीवर होते. ओसाडे भागात संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ तपास केला. यावेळी चौसिंगा हरणाला गोळ्या घालून ठार मारल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी हरणाचे मांस, रक्ताने माखलेले हात आणि शस्त्रसामग्री आढळून आल्याने हा गुन्हा उघडकीस आला.
या प्रकरणी समीर वसंत पिलाणे (वय ३६) व गणेश बबनराव लोहकरे (वय ३८, दोघे रा. ओसाडे), नवनाथ चंद्रकांत पवळे (वय ४०, रा. सोनापूर, ता. हवेली) आणि पांडुरंग दत्तात्रय कदम (वय ४७, रा. निगडे मोसे, ता. राजगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक व अन्य हत्यारे वन विभागाने जप्त केली आहेत.
प्राथमिक तपासात या चौघांनी सरकारी वनक्षेत्रालगतच्या खासगी मालकीच्या जंगलात दबा धरून चौसिंगा हरणाची शिकार केल्याचे समोर आले आहे. चौसिंगा हा अत्यंत दुर्मीळ आणि संरक्षित वन्यप्राणी असून, त्याची शिकार केल्याने जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतो, असे वन्यजीव तज्ज्ञांचे मत आहे.
या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे पुढील तपास करीत आहेत. त्यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांची शिकार हा गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास संबंधितांना सात वर्षांपर्यंत कारावास व किमान २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामे, जप्तीची कारवाई तसेच परिसरातील तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
दरम्यान, यापूर्वीही या किंवा इतर शिकाऱ्यांनी राजगड, पानशेत, सिंहगड तसेच पश्चिम हवेली भागातील जंगलांमध्ये वन्यजीवांची शिकार केली आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडे असलेल्या बंदुकीचा परवाना वैध आहे का, इतर कोणते शिकारी या टोळीत सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आगामी काळात गस्त वाढवण्यात येणार असून, शिकाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेण्यात येईल, असा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे. वनसंपदेवर होणारे असे घातक हल्ले रोखण्यासाठी नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ वन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







