पुणे: पुण्यातील सहकारनगर परिसरातून एक अत्यंत (Pune Crime) धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा गैरफायदा घेऊन एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाने मुलीला ‘कुत्रा दाखवण्याच्या’ बहाण्याने घरी बोलावून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, पीडित मुलगी आता १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत (वय २३, रा. धनकवडी, पुणे) असे आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या १६ वर्षांची आहे. आरोपी प्रथमेशने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या मुलीशी ओळख वाढवली होती. संवादातून मैत्री वाढल्यानंतर, नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने “माझ्या घरी नवीन कुत्रा आणला आहे, तो बघायला ये,” असे सांगून तिला आपल्या घरी बोलावले.
मुलगी घरी आल्यानंतर, तिने विरोध करूनही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. “मी तुझ्याशी लग्न करणार आहे, हे सगळं आजकाल कॉमन आहे,” असे सांगून त्याने तिची दिशाभूल केली आणि वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या दरम्यान सातत्याने सुरू होता.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला सतत उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले असता, तिची सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा ती १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सहकारनगर पोलिसांनी आरोपी प्रथमेश राऊत विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







