Hadapsar crime: पुणे : हडपसर परिसरातील शिंदे वस्ती भागात किरकोळ कारणावरून एका 24 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 19 डिसेंबरच्या रात्री मित्रांसोबत शेकोटी पेटवून बसलेल्या यासीन जब्बार शेख याच्यावर नऊ जणांच्या टोळीने अमानुषपणे मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Brutal assault case)

हेही वाचा- तरुण उमेदवार कोमात, ७७ वर्षांची माऊली जोमात; विजयी गुलाल लागताच आजीबाईंना अश्रू अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, यासीन शेख आणि त्याचे काही मित्र आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शेकोटी करून थंडीचा आनंद घेत गप्पा मारत होते. त्याच वेळी ओंकार झोंबाडे हा तेथे आला. त्याने यासीनकडे पाहत तू माझ्याकडे रागाने का पाहतोयस, असा सवाल करत वाद सुरू केला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच वाढत गेला.
वाद वाढल्यानंतर ओंकार झोंबाडे याने फोन करून आपल्या इतर 8 साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच सर्व आरोपी तेथे दाखल झाले. त्यानंतर आरोपींनी लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने यासीन शेखवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात यासीन गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी मध्यस्थी करत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ओंकार झोंबाडे, तुषार काकडे, दाद्या बगाडे, शश्या उर्फ रोहन पिंगळे, किशोर काकडे, दीपू शर्मा, देव शिरोळे, मोन्या कुचेकर आणि कैलास काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.







