पुणे: पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पुणे मेट्रोच्या विस्ताराला 9 हजार 880 कोटी रुपयाच्या आवश्यक निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (26 नोव्हेंबर) रोजी पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-2 ला मंजुरी दिली असून या फेजमध्ये लाईन-4 खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला आणि लाईन-4A नळ स्टॉप–वॉरजे–माणिक बाग या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. “आझादी का अमृत महोत्सव”च्या काळात पुण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कसा असेल मार्ग?
हा मेट्रो मार्ग एकूण 31.636 किमी लांबीचा असणार आहे. या दोन्ही मार्गांवर एकूण 28 स्थानकं उभारले जातील. अंदाजे 9,800 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून या मेट्रो मार्गामुळे खराडी आयटी पार्क, हडपसर औद्योगिक क्षेत्र, स्वारगेट, वारजे, माणिक बाग या भागाला जोडणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळली जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात मेट्रोच्या दुसऱ्या फेजची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.







