
वाघोली: बकोरी फाटा येथील बस डेपो परिसरात प्रचंड प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना आरोग्यविषयक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे येथे मच्छर, डास आणि उंदीरांचा उपद्रव वाढला असून, साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या भागातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
बस डेपो परिसरात उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यात अन्नाचा उरलेला भाग, प्लास्टिक, तसेच काही धोकादायक वस्तूही आढळत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, श्वास घेणेही कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांना याचा मोठा त्रास होत आहे. पाण्याचे प्रदूषण आणि हवेमार्गाने पसरणाऱ्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कचरा साफ करणे, निर्जंतुकीकरण करणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सततच्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आता नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज याच दुर्गंधीतून प्रवास करावा लागत असल्यामुळे येथील नागरिकांच्याआरोग्याला धोका निर्माण होत आहे. विशेषतः लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई केली पाहिजे, “हा परिसर डेपो वाटत नाही, तर कचराकुंडी वाटते. दररोज येथे प्रवास करताना नाकावर रुमाल ठेवावा लागतो. हा अपमानास्पद आणि धोकादायक प्रकार आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रत्येक दिवशी हा कचरा वाढत असल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतोय आणि शहराची प्रतिमाही खराब होत आहे. स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासाची मागणी करणं हा आमचा मूलभूत हक्क आहे.” असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) तात्काळ लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.







