Daund Crime: पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही अशातच, मतदानाच्या काही तासांपूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar गटाच्या पराभूत उमेदवारावर भर चौकात पाठलाग करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडला आहे. या घटनेचा दुसरा व्हिडिओ (Video) समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतरही दौंड पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे दहशत माजवणाऱ्या टोळक्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप होत असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारावर काही अज्ञात तरुणांच्या टोळक्याने हल्ला केला. भर बाजार चौकात आधी त्याचा पाठलाग करण्यात आला आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा पहिला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मारहाणीचा संपूर्ण प्रकार अधिक स्पष्ट झाला आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्येही हल्लेखोरांचे चेहरे, वाहनांची माहिती आणि घटनास्थळ स्पष्ट दिसत आहे. असे असतानाही दौंड पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा हल्ला राजकीय वैरातूनच झाल्याचा आरोप संबंधितांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भर चौकात उमेदवारावर हल्ला होत असेल आणि त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस कारवाई करत नसतील, तर सामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पोलिसांकडून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, दौंड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद होत आहे. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






