पुणे: पुण्यातील बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात (Bopodi Land Scam) निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या आदेशाबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी होणारी सुनावणी दोन्ही बाजूंचे पक्षकार अनुपस्थित राहिल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून आता ती 18 मार्च रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीच्या जमिनीवर कुळांची नावे लावण्याचा आदेश येवले यांनी दिला होता. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तत्काळ संबंधित फेरफार अंमलात येऊ नयेत, असे निर्देश दिले. त्यानंतर येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान, संबंधित आदेश नियमानुसार रद्द करण्यासाठी सुनावणी घेणे आवश्यक होते. सुरुवातीला पुण्याचे उपविभागीय अधिकारी सुनील जोशी यांनी कृषी महाविद्यालय आणि इतर पक्षकारांना नोटीस बजावली. मात्र काही पक्षकारांनी जोशी यांच्या सुनावणीवर आक्षेप घेत स्वतंत्र, त्रयस्थ अधिकाऱ्याकडून सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुनावणी कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्या कार्यालयात घेण्याचे ठरले.
नवीन नियोजनानुसार 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र कृषी महाविद्यालय तसेच इतर पक्षकार अनुपस्थित राहिल्याने टिळेकर यांनी सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलली. आता 18 मार्च रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.






