पुणे: राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा (Big Breaking) जोर वाढला असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा आणि रोड शो सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यात रोड शोसाठी दाखल झाले होते. दुसरीकडे मुंबईत (Pune News) ठाकरे बंधूंची एकत्र जाहीर सभा होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. अशा वातावरणात पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली.

पुण्यातील भोसरी परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू असताना फटाके वाजवण्यात आले. यावेळी एका इमारतीवर फटाक्यांमुळे आग लागली. रोड शो सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत इमारतीवरील मोबाईल टॉवर जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आग मोठी होण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान रोड शो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नागरिकांना रोखण्यासाठी दोर लावले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे दोर काढण्याचे आदेश पोलिसांना दिले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फटाक्यांमुळे झालेल्या आगीच्या घटनेनंतर रोड शो दरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुण्यातील या घटनेमुळे निवडणूक प्रचारात सतर्कता बाळगण्याचा इशाराच मिळाल्याचे बोलले जात आहे.







