पुणे: आपल्या हटके आणि विनोदी (Atharva Sudame Controversy) रिल्समुळे ओळख निर्माण करणारा पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये शूट करण्यात आलेल्या एका (Pune News) रिलमुळे हा वाद निर्माण झाला असून पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने अथर्व सुदामेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे तसेच संबंधित व्हिडीओ तात्काळ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही PMPML कडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

PMPML बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केल्याचा आणि त्या रिलमध्ये महिला प्रवाशांबाबत आक्षेपार्ह आशय दाखवण्यात आल्याचा ठपका अथर्व सुदामेवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्या असून विविध माध्यमांतून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेने अखेर या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
थेट वादावर भाष्य न करता अथर्वने सोशल मीडियावर सुरू असलेल्या चुकीच्या चर्चांवर मौन सोडले आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिले की, अनेक न्यूज चॅनेल्स आणि माध्यमे माझा रील न पाहता मनमानी बातम्या पसरवत आहेत. आपण कोणालाही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कोणाशीही चर्चा केलेली नाही, तरीही काही जण माझा फोटो आणि नाव वापरून खोटे विधान पसरवत आहेत. काही लोक तर एआयचा वापर करून माझ्या नावाने खोटी विधानं तयार करत आहेत, असा आरोपही त्याने केला.
अथर्व सुदामेने नागरिकांना आणि चाहत्यांना अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. मला काही सांगायचे असेल तर ते मी थेट माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बोलेन, असेही त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, PMPML प्रशासन या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







