पुणे: राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, निवडणुकांच्या तोंडावर पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपल्या चिरंजीव विकार शेख यांच्यासह काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. शेख पिता-पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. (pune politics latest news)

महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाला मोठा धक्का
महानगरपालिका निवडणुकांच्या अगदी तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे पुणे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मुख्तार शेख हे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. या काळात त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून पुणे शहराचे प्रतिनिधित्व केले असून, काँग्रेसमधील अल्पसंख्यांक समाजाचा एक प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.
पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप
काँग्रेसमधून बाहेर पडताना मुख्तार शेख यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले “काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत आहे,” अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या व्होट बँकेला मोठा फटका
पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसचा मोठा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः विकार शेख यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या व्होट बँकेला मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असताना, चार दशकांहून अधिक काळ पक्षासाठी काम करणारा नेता बाहेर पडल्याने काँग्रेसपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत.






