Crime News : हरयाणा राज्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या घरातून आनंदाने वरात निघणार होती, त्या घरातून थेट अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. किरकोळ कारणावरून वडिलांनी ओरडल्यामुळे 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची ही घटना हरयाणातील नूंह जिल्ह्यात घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव मुबसिर असे आहे.

हेही वाचा- पुण्यात भररस्त्यात अश्लील चाळे! महिला रस्त्यात उभ्या राहतात अन् मग सुरू होतो गलिच्छ खेळ
मुबसिरचे लग्न रविवारी ठरले होते. शनिवारी रात्री घरात मेंदीचा कार्यक्रम सुरू होता. लग्नाच्या आनंदात मुबसिरने खास डीजेची व्यवस्था केली होती. डीजेच्या तालावर नाचगाणे सुरू होते आणि घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, डीजेचा मोठा आवाज काही ज्येष्ठ मंडळींना त्रासदायक वाटू लागला. यावरून घरात वाद झाला. मुबसिरचे वडील अहमद यांनी सर्वांसमोर त्याला भरपूर ओरडले आणि डीजे बंद करण्यास सांगितले.
सर्वांसमोर वडिलांनी दिलेल्या फटकारामुळे मुबसिरला राग अनावर झाला. मेंहदीचा कार्यक्रम संपल्यानंतर तो कोणालाही काही न सांगता आपल्या खोलीत गेला. रविवारी सकाळी त्याची वरात निघणार होती. मात्र, त्याआधीच सकाळी घराशेजारील शेतात असलेल्या लोखंडी प्लॅटफॉर्मला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही बातमी समजताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असताना घडलेल्या या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला. नवरीच्या घरीही आनंदाचे वातावरण होते आणि ती आपल्या होणाऱ्या पतीची वाट पाहत होती. मात्र, नवरदेवाच्या आत्महत्येची माहिती मिळताच आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले.
ही घटना रोजका मेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिठौडा गावात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. प्राथमिक तपासात डीजेच्या वादातून वडिलांनी दिलेल्या फटकारामुळेच मुबसिरने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






