मुंबई: मुंबईत (Crime News) पोलिसांनी एका अत्यंत धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा केला असून तब्बल 16 वर्षांनंतर एका नराधम सिरीयल रेपिस्टला बेड्या ठोकल्या आहेत. महेश पवार असे या 51 वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्यावर आतापर्यंत 7 महिलांनी बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीने एका मूकबधिर महिलेवर 2009 पासून सतत अत्याचार केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला विरार परिसरातून पकडले आहे. पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलांची संख्या 24 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस या सर्व प्रकरणांचे ठोस पुरावे गोळा करत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्याची वाचा एका महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे फुटली. आरोपीने दुसऱ्या एका मूकबधिर महिलेवरही अत्याचार केल्याचे समजताच, गेल्या 16 वर्षांपासून दहशतीखाली असलेल्या पीडितेने हिंमत एकवटली आणि पतीला सर्व प्रकार सांगितला. जेव्हा ही पीडित महिला अल्पवयीन होती, तेव्हा एका मैत्रिणीने तिला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने सांताक्रूझ येथील आरोपीच्या घरी नेले होते. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपीने या कृत्याचे चित्रीकरण केले होते आणि त्या व्हिडिओच्या जोरावर तो तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल करत होता.
दुभाषिकांच्या मदतीने तिने आपल्यावर झालेला अन्याय पोलिसांना सांगितला. पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी आरोपीला अटक केली असून कुरार आणि वाकोला परिसरात या आरोपीने अनेक महिलांचे शोषण केल्याचा पोलिसांना संशय आहे. एका धाडसी तक्रारीमुळे या सिरीयल रेपिस्टचा पर्दाफाश झाला आहे.







