उरुळी कांचन, ता. 25 : उरुळी कांचन पंचक्रोशीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. 26) सायंकाळी 6 वाजता ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे. यावर्षीच्या यात्रेत प्रथमच सादर होणारा ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.

यंदाची शोभायात्रा अधिक देखणी आणि भव्य करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरुळी कांचनमध्ये प्रथमच ‘नरसिंह अवतार’ जिवंत देखावा सादर केला जाणार आहे. शोभायात्रेमध्ये खास आकर्षण म्हणून ‘केरळ नृत्य’ सादर केले जाईल. तसेच आकर्षक सजावट आणि डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणुकीत ‘राजदत्त साऊंड अँड लाईट’ आपली सेवा देणार असून फटाक्यांची भव्य आतिशबाजीही केली जाणार आहे. तसेच भक्तांना श्रीराम पादुकांचे दर्शन घेण्याची विशेष संधी मिळणार आहे.
दरम्यान, सदर पालखी आणि मिरवणूक उरुळी कांचन हद्दीतील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था ते एम.जी. रोड मार्गे आश्रम रोडपर्यंत जाणार आहे. श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन आणि मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उरुळी कांचन पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.







