PMC : शहरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना स्वस्तात निदान सुविधा मिळावी यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या पेट स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते.

या रुग्णालयांमधील दर अतिशय जास्त असल्याने अनेक रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर ‘पेट स्कॅन आणि रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प’ सुरू करण्याची तयारी केली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे शहरातील गरजू रुग्णांना कमी दरात कर्करोग तपासणीची सुविधा मिळणार आहे. स्वारगेट येथील हिराबाग आरोग्य कोठी शेजारी असलेल्या वसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी स्वतः स्थळ पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे उपस्थित होते.
या प्रकल्पात पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या अत्याधुनिक निदान तंत्रज्ञानांचा समावेश असेल. पुणे महापालिका स्वतःच्या आरोग्य यंत्रणेतून पेट स्कॅन आणि रेडिओ डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, महापालिकेने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना कमी दरात कर्करोग तपासणी करता येणार आहे. ही सेवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (CGHS) दरात उपलब्ध करून दिली जाणार असून, रुग्णांचा तपासणीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत होणार आहे आणि शहरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.







