Pune Traffic : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 26 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने शहरातील विविध भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. भोसरी, चिखली आणि चाकण या भागांमध्ये विशेष निर्बंध लागू असतील.
भोसरी परिसरात हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड आणि दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. या भागातील वाहतूक आळंदी रोडमार्गे वळवण्यात येणार आहे. चिखली आणि मोशी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावरून मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कुदळवस्तीकडे जाणारा मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी भारतमाता चौक हा पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चाकण परिसरात चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड भागात वाहतूक परिस्थितीनुसार वळवली जाईल. मिरवणुकीतील वाहने आणि रुग्णवाहिका यांना मात्र सूट देण्यात आली आहे.
शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







