पिंपरी: पिंपरी (Pimpri News) शहरात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकावर हॉटेल कर्मचाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना केवळ ताटात पाण्याचे थेंब उडाल्याच्या किरकोळ वादातून घडली आहे. पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेले ३३ वर्षीय आशुतोष पांडुरंग काटे हे २३ डिसेंबर रोजी मंगळवारी संध्याकाळच्या वेळी आपल्या मित्रांसोबत जेवण्यासाठी पिंपरीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण सुरू असताना तिथल्या वेटरने टेबलवरील टिश्यू पेपर उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी त्याच्या हातातील पाण्याचे काही थेंब आशुतोष यांच्या ताटात पडले. या गोष्टीवर आशुतोष यांनी आक्षेप घेत वेटरला नीट काम करण्याबद्दल समज दिली.

आपल्याला टोकल्याचा राग आल्याने वेटरने लगेचच इतर दोन जणांना तिथे मदतीला बोलावले. विशाल आणि मोनू बहोत नावाच्या दोन व्यक्तींनी आशुतोष यांच्याशी वाद घातला आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच मोठ्या हाणामारीत झाले आणि आरोपींनी रागाच्या भरात थेट हॉटेलच्या किचन मधून कांदा कापण्याचा स्टीलचा मोठा चाकू आणून त्यांनी आशुतोष यांच्या नाकावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात आशुतोष काटे हे रक्तबंबाळ झाले असून गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी तरुणाने या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार विशाल आणि मोनू या दोघांवर गुन्ह्याची नोंद केली आहे.







