पुणे: पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यात (Pune Crime) विश्वासघाताचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालवाहू पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणानेच मालकाचा विश्वास तोडत सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांच्या लोखंडी सुट्या भागांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. माल कंपनीत पोहोचवण्याऐवजी त्याने वाटेतच विक्री करून गाडी बेवारस अवस्थेत सोडून पळ काढल्याचे तपासात उघड झाले आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी सोनल बलभीम अरडे (वय 31, रा. चाकण) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर इरफान अन्सारी (वय 26, मूळ रा. उत्तर प्रदेश) चालक म्हणून कार्यरत होता. 9 फेब्रुवारी रोजी मोशी येथून नऱ्हे येथील कंपनीकडे लोखंडी सुटे भाग वाहून नेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.
माल वेळेवर पोहोचला नसल्याने संशय निर्माण झाला. चौकशी केली असता इरफानने माल कंपनीत पोहोचवलाच नसल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासानुसार, त्याने वाटेतच लोखंडी भागांची विक्री करून रक्कम स्वतःजवळ ठेवली. त्यानंतर संशय टाळण्यासाठी पिकअप गाडी नवी मुंबई विमानतळ परिसरात सोडून तो फरार झाला.
गाडी बेवारस स्थितीत आढळल्यानंतर आणि माल गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. औद्योगिक भागात वाहतूक करणाऱ्या मालाच्या सुरक्षिततेबाबत हा प्रकार गंभीर मानला जात असून, मालकांनी चालकांची पार्श्वभूमी पडताळणी आणि जीपीएससारख्या यंत्रणांचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.







