पिंपरी-चिंचवड: फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींना शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबवलेल्या विशेष ‘मिशन वॉन्टेड’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या 15 दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल 247 आरोपींना पकडले. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास आणि शोधमोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी पोलिसांकडे विविध गुन्ह्यांतील 2,635 पाहिजे आरोपी आणि 32 फरारी आरोपी, असे एकूण 2,667 आरोपींची नोंद होती. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानंतर पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. जुन्या पत्त्यांपासून नातेवाईक आणि आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत माहिती गोळा करून शोध घेण्यात आला.

या मोहिमेत पोलीस ठाण्यांच्या पथकांनी 140, तर गुन्हे शाखेने 107 आरोपींना अटक केली. काही प्रकरणांमध्ये आरोपींचा मृत्यू, आधीच झालेली कारवाई किंवा दुबार नोंद आढळल्याने आणखी 79 प्रकरणे कमी झाली. त्यामुळे एकूण 326 प्रकरणांचा निपटारा झाला असून, अजून 2,341 आरोपींचा शोध बाकी आहे.

गुन्हे शाखेच्या कामगिरीत अँटी गुंडा स्कॉडने आघाडी घेतली. या पथकाने 21 आरोपी पकडून 132 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. युनिट 3 ने 103 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. युनिट 1 आणि युनिट 2 यांना प्रत्येकी 84 गुण मिळाल्याने त्यांना संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला.
पोलीस ठाण्यांमध्ये हिंजवडी पोलिसांनी 19 आरोपी पकडून 84 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो.
या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपींवर दबाव वाढला आहे. उर्वरित आरोपींचा शोधही याच पद्धतीने सुरू ठेवला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले आहे.






