उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झोपडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जळत्या झोपडीसमोर उभ्या असलेल्या या तरुणी शिवानी कश्यपने संताप व्यक्त करत सूड घेण्याची भाषा केल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. तरुणी व्हिडिओमध्ये जळत्या झोपडीसमोर उभी राहून, संताप व्यक्त करत सांगत आहे कि, त्यांनी माझं घर जाळलं, मी फूलन देवी बनून सूड घेईन.

लाभारी गावात एका जमिनीच्या मालकीवरून दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती आहे. नन्हीं देवी यांनी संबंधित जमिनीची सरकारी मोजणी करून ताबा मिळावा, यासाठी तहसील कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार 29 सप्टेंबर रोजी महसूल विभागाचे पथक आणि पोलीस बंदोबस्त गावात पोहोचला. मोजणीनंतर जमीन नन्हीं देवी यांच्या ताब्यात देण्यात आली.

यानंतर 30 सप्टेंबर रोजी त्या जागेवर बांधकामासाठी पाया टाकण्यात आला. मात्र, दुसऱ्या पक्षाने हा पाया उखडल्याचा आरोप नन्हीं देवी यांनी केला. त्यानंतर पुन्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. 1 ऑक्टोबर रोजी महसूल अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी गेले असताना रामप्रसाद यांच्या जुन्या झोपडीला आग लागली.

या घटनेनंतर शिवानी कश्यप या तरुणीने अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी लाच घेऊन विरोधी पक्षाला मदत केली आणि झोपडी पेटवली. मात्र, बदायू पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सरकारी मोजणीची कारवाई थांबवण्यासाठी आणि प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी संबंधित कुटुंबातील काही लोकांनी स्वतःच झोपडी पेटवली आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 9 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर बदायूचे समाजवादी पक्षाचे खासदार आदित्य यादव यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. या प्रकरणात कोणत्याही निरपराध व्यक्तीवर कारवाई होऊ नये, तसेच तपास स्थानिक पोलिसांऐवजी अन्य पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






