पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) रहाटणी भागात वर्षाच्या शेवटच्या दिवशी नखाते चौकात रस्ता ओलांडणाऱ्या एका ७७ वर्षांच्या वृद्ध महिलेला भरधाव हायड्रोलिक क्रेनने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मीबाई खाणेकर असे या मृत महिलेचे नाव असून त्या ताथवडे येथील रहिवासी होत्या. बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नातेवाईकांची भेट घेण्यासाठी वृद्ध महिला रहाटणीत गेल्या होत्या. नातेवाईकांना भेटून झाल्यानंतर त्या नखाते चौकातील एका स्टुडिओत फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना रस्ता ओलांडताना उजव्या बाजूने आलेल्या MH 14 LG 4227 या क्रमांकाच्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की लक्ष्मीबाई क्रेनच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक शंतनू निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित क्रेन चालकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरु आहे.







