पिंपरी, ता. 06 : पिंपरी-चिंचवड (Pimpri) महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान अजित पवार गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेला एबी फॉर्म अचानक गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर त्रुटीची दखल घेत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला असून उमेदवाराला घड्याळ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एबी फॉर्म अद्यापही सापडलेला नसल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडील कामकाज काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली.
जयश्री भोंडवे यांनी प्रभाग क्रमांक 16 मधून ओबीसी महिला आरक्षणांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी एबी फॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण देत निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार घोषित केले होते.
या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी अर्ज सादर करतानाचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओग्राफी तसेच अन्य तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांमध्ये तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने स्वतंत्र सुनावणी घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले.
यानंतर झालेल्या सुनावणीत भोंडवे यांनी मुदतीत उमेदवारी अर्जासह एबी फॉर्म सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी एबी फॉर्म ग्राह्य धरत अंतिम छाननी यादीत दुरुस्ती केली. परिणामी, चिन्ह वाटप प्रक्रियेत जयश्री भोंडवे यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.
दरम्यान, या गोंधळास जबाबदार ठरलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनातील कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.







