Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी शहराला हादरवून सोडले आहे. एका बाजूला 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू, तर दुसरीकडे 20 वर्षीय तरुणाने मानसिक ताणाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घटना या दोन्ही प्रसंगांनी समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत.

चिंचवडमधील चिंचवडे नगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने आपली गर्भावस्था कुटुंबापासून लपवली होती. 24 मार्च रोजी सकाळी तिची प्रकृती अचानक बिघडली आणि घरातच बाळंतपण झाले. मात्र योग्य वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने तिची प्रकृती झपाट्याने खालावली. तिला प्रथम रावेतमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे हलवण्यात आले. नवजात बाळालाही यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळपर्यंत बाळाचा आणि त्यानंतर आईचाही मृत्यू झाला.







