Parth Pawar Land Scam Pune: शहरातील मुंढवा भागात झालेल्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता “1 टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, आणि 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर नाही का?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता “1 टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, आणि 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर नाही का?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणात दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रविंद्र तारु या तिघांवर शासनाचा तब्बल 5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. शितल तेजवानी यांनी केवळ पॉवर ऑफ एटर्नीवर 16.19 हेक्टर (सुमारे 40 एकरांहून अधिक) जमिनीचा सुमारे 300 कोटी रुपयांचा व्यवहार केला, मात्र यावर केवळ 500 रुपयांचे स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सूची क्रमांक 2 मध्ये ही जमीन मुंढवा (पुणे शहर) मध्ये असतानाही सोयीसाठी ती मुळशी तालुक्यात दाखवण्यात आली होती.
तसेच दस्तावेजांमध्ये अमेडिया एंटरप्रायजेस कंपनीतील दिग्विजय पाटील यांचे लिंग ‘स्त्री’ असे लिहले गेले असल्याचंही निदर्शनास आलं. या कंपनीत दिग्विजय पाटील यांचा फक्त 1 टक्का आणि पार्थ पवार यांचा 99 टक्के हिस्सा असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होऊन पार्थ पवारांवर कारवाई न झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. कोण आहे दिग्विजय पाटील? दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी असून, पार्थ पवारांचे मामा अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत.
या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, पार्थ पवारांच्या कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतली आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरली. उद्योग संचालनालयाने 48 तासांत ड्युटी माफ केली आणि संपूर्ण व्यवहार फक्त 27 दिवसांत पूर्ण झाला. या कंपनीचे भांडवल फक्त एक लाख रुपये असताना, त्यांनी हजारो कोटींचा व्यवहार कसा केला, असा थेट प्रश्न अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.







