पुणे : उसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना धनकवडी भागात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आजिनाथ सर्जेराव लोखंडे (वय ४२, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोखंडे यांना धमकावून आत्महत्येस प्रवृ्त केल्याप्रकरणी रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी, आंबेगाव, कात्रज), मयूर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारिका आजिनाथ लोखंडे (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे यांचा भंगार माल खरेदीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी आरोपींकडून ऊसने पैसे घेतले होते. व्यवसायातील मंदीमुळे लोखंडे याने पैसे परत करण्यास उशीर केला. त्यामुळे आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
दरम्यान, आरोपींनी केलेला छळ आणि दिलेल्या धमकीमुळे लोखंडे सतत तणावाखाली होते. अखेर धमकी आणि गुंडगिरीला घाबरून लोखंडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोखंडे यांची पत्नी सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करत आहेत.