उरुळी कांचन : हार्पिक, लायसॉल अशा नामांकित कंपन्यांच्या बनावट उत्पादनांची विक्री करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका दुकानावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे 56 हजार 170 रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत. बुधवारी (ता. 20) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मनोज सुरेश लुंकड (वय- 52, रा. दातार कॉलनी, व्यवसाय महावीर एजन्सी, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्फराज तांबोळी, (रा. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज तांबोळी हे स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. रॅकेट बॅकायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ग्राहक असून कंपनीने पोलिसांच्या मदतीने उत्पादक-विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार तांबोळी यांना दिलेले आहेत. त्यानुसार कंपन्यांचे कॉपीराईटचे हक्क बघणाऱ्या एजन्सीला उरुळी कांचन येथील महावीर एजन्सीतून बनावट हार्पिक, लायझोलची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, उरुळी कांचन पोलिसांना माहिती देऊन त्याच्या पथकाने छापा टाकला असता मनोज लुंकड हा त्याच्या महावीर एजन्सीतून कॉपीराइट केलेले बनावट हार्पिक, लायझोलची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. उरुळी कांचन पोलिस पथकातील पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले, पोलीस हवालदार अजित काळे, ए.एम. राऊत यांनी महावीर एजन्सीतून 56 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्फराज तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनोज लुंकड याच्यावर कॉपीराइट कायदा 1957 च्या कलम 51,63, 65, आणि बी. एन. एस. कलम 318(4), 349 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुकानदारही जादा कमिशन मिळत असल्याने हा माल ठेवत होते. कंपन्यांचे कॉपी राईट बघणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधींना याची खबर मिळाल्यावर त्यांनी काही दुकानांत जाऊन मालाची तपासणी केली. तेथे बनावट माल आढळल्यावर तो पुरवठा कोठून होतो, याची माहिती घेतली गेली. या प्रकरणाचा तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.
सेंट-गोबेन इंडिया कंपनीच्या बनावट साहित्याची विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
सेंट-गोबेन इंडिया हि एक फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय उपकंपनी आहे, जी बांधकाम, ऑटोमोटिव्ह आणि ग्राहकोपयोगी उत्पादने यांसारख्या बांधकाम आणि औद्योगिक बाजारपेठांसाठी साहित्य आणि सेवा डिझाइन, उत्पादन आणि वितरण करते. सोलापुर-पुणे रोडच्या बाजुला गारवा हॉटेल समोर, गट नं. 351 मधील राठोड जिप्सम एजेन्सी येथे लक्ष्मण राठोड याने गोडावूनमध्ये कंपनीचे बनावट साहित्य तयार करून विक्री करीत असल्याचा प्रकार मे महिन्यात उघडकीस आला होता. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






