Lonikalbhor : हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीमाळवाडी परिसरात मंगळवारी (ता. 3) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तीन जणांना अटक करून सुमारे 15 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

अक्षय बजरंग मुळेकर (वय-25 , मंदा बजरंग मुळेकर (वय-45, दोघेही रा. हनुमान मंदीराजवळ, कवडी माळवाडी , दत्तपार्क, कदमवाकवस्ती ता. हवेली जि पुणे) व राहूल बाळकृष्ण तावरे (वय-46, रा. भेकराईनगर, लेन नं.2 . फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष रावसाहेब तांदळे (वय-46) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवडी माळवाडी येथील पत्र्याच्या शेडच्या आडबाजूस दोन पुरूष व एक महीला तयार हातभट्टी गावठी दारु जवळ बाळगून चोरुन लपुन विक्री करत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, वरील तिन्ही आरोपी हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींच्या कब्जातून 1 हजार 900 रुपयांची 15 लीटर गावठी हातभट्टी दारु असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात महाराष्ट्र वारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, पोलीस हवालदार रामहरी वणवे, संतोष तांदळे, प्रदीप गाडे, संदीप जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.




