BJP Rajya Sabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली असून, या यादीत काही अनपेक्षित नावांचा समावेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चर्चेत असलेल्या अनेक नावांना डावलत भाजपने धक्कातंत्राचा वापर केला आहे.

भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे.
राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक समतोल या निकषांवर भाजपने उमेदवारांची निवड केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी देताना भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये दीर्घ चर्चा झाल्यानंतर अखेर चार नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत मायाताई ईवनाते?
माया चिंतामण ईवनाते या भाजपच्या अभ्यासू आणि सक्रिय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे. त्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) च्या माजी सदस्या राहिल्या आहेत. या काळात त्यांना राज्यमंत्री दर्जा मिळाला होता. महिला नेतृत्व, आदिवासी प्रतिनिधित्व आणि विदर्भाचा चेहरा या तिन्ही बाबी लक्षात घेऊन भाजपने त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे.
कोण आहेत रामराव वडकुते?
रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. सध्या ते अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विशेषतः धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत.
भाजपच्या या यादीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे संकेत मिळत असून, आगामी राज्यसभा निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.






