Crime News: नाशिक: नाशिकमधील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून इतर लहान विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये भीतीचे तर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीतील काही विद्यार्थ्यांनी 5 वी ते 7 वीतील विद्यार्थ्यांवर अनैतिक कृत्य केल्याचा आरोप आहे. संबंधित विद्यार्थ्यांना गुंगीचे औषध किंवा मद्य दिल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर संतप्त पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पालकांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृह प्रशासनाकडून योग्य देखरेख न झाल्यामुळे हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच तक्रार नोंदवताना पोलिसांकडून विलंब होत असल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे. मात्र पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस स्टेशनकरत आहेत.





