Loni kalbhor : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याची 100 एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याचा व्यवहार आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असताना, आता अध्यक्ष–उपाध्यक्ष व काही संचालक मिळून कारखान्याची उर्वरित 124 एकर जमीन भाडेपट्ट्याने देणे आणि आसवणी प्रकल्पासह कारखान्याची सामग्री विकण्याचा घाट घालत असल्याची चर्चा समोर आली आहे. ही चर्चा बाहेर नव्हे, तर खुद्द संचालक मंडळातच जोरदार रंगली आहे. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

यशवंत साखर कारखान्याकडे मूळतः सुमारे 248 एकर जमीन मालकीची होती. त्यापैकी कर्जफेडीसाठी 24 एकर जमीन आधीच एका खासगी कंपनीला विकण्यात आली आहे. बँका, सभासद, कर्मचारी व इतर देणी भागवण्यासाठी आता 100 एकर जमीन बाजार समितीला विकण्यात येणार आहे. तर सोमवारी (ता.16) झालेल्या कारखान्याची मासिक बैठकीत कारखाना पुनर्जीवित करण्याऐवजी जमीन विक्री, गोडाऊन भाड्याने देणे, प्लांट स्क्रॅपमध्ये विकणे आणि उर्वरित 124 एकर जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा काही संचालक मंडळाने घाट घातला आहे. अशी चर्चा आहे..
विशेष म्हणजे, 100 एकर जमिनीचा व्यवहार महसूल विभागाच्या क्लिअरन्स अभावी प्रलंबित असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात स्पष्ट आदेश देत परवानगीशिवाय कोणताही व्यवहार करू नये असे बजावले होते. तरीही उर्वरित125 एकर जमीन भाड्याने देण्याबाबत हालचाली सुरू असल्याने, सर्व नियम धाब्यावर बसवून काही संचालक मंडळ थेट सभासदांच्या भवितव्यावर घाला घालत असल्याचा आरोप तीव्र होत आहे.
दरम्यान, 23 जानेवारी 2026 रोजी कारखाना अधिकृतपणे संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भंगार, जमीन आणि मालमत्तेचे निर्णय झपाट्याने घेतले जात आहेत. हजारो सभासद, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी कारखाना सुरू होईल या आशेवर वाट पाहत आहेत. मात्र कारखाना सुरू करण्यावर एक शब्द नाही. पण विक्री आणि भाडेपट्ट्यावर जमीन देण्याच्या हालचाली झपाट्याने दिसून येत आहे. अशी चर्चा संचालक मंडळांमध्ये सुरु आहे.
काही संचालकांच्या खिशात जाणार कोट्यवधी रुपये?
सभासदांमध्ये सध्या एकच प्रश्न घुमतो आहे . “कारखाना चालवायचा नाही, फक्त मालमत्ता विकून काही संचालक स्वतःचा फायदा करून घेणार का?” भंगार विक्रीतून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ संचालक मंडळालाच होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुढील प्रोसिडिंगमध्ये हे सर्व निर्णय अधिकृत मंजुरीसाठी मांडले जाणार असल्याची माहिती आहे. हा डाव वेळीच उधळला नाही, तर उद्या संपूर्ण कारखानाच विकून खाते साफ केले जाईल, अशी भीती सभासद व्यक्त करत आहेत.
हे सर्व आरोप बिनबुडाचे असून यामध्ये काहीही तथ्य नाही. पुणे सोलापूर महामार्गाचे काम थोड्या दिवसातच सुरु होणार आहे. कामाचे टेंडर मिळविलेल्या कंपनीला साहित्य व गाड्या लावण्यासाठी 100 ते 125 एकर जागा लागणार आहे. आपल्या कारखान्याचा फायदा होईल? त्यादृष्टीने एका संचालकाने मासिक बैठकीत वरील विषय मांडला आहे. परंतु, यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सभासदांना गोंधळून जाण्यासारखे काहीही कारण नाही.
सुभाष जगताप (अध्यक्ष – यशंवत सहकारी साखर कारखाना, थेऊर, ता. हवेली)







