पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच एक हजार नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. पीएमआरडीएने ५०० बस खरेदीचा निर्णय घेतला असून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकादेखील ५०० बस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) ताफ्यात बस संख्या कमी असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण वाढला आहे, तर खासगी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पीएमपीएलसाठी नवीन बस खरेदीबाबत संकेत दिले होते. या उपाययोजनांमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी सीएनजीवरील १००० बस खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते.
निर्णयानुसार, पीएमआरडीए ५०० बस पीएमपीएलला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात बस खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना ५०० बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. सध्या या शहरांमध्ये ६००० बसांची गरज असून रस्त्यावर फक्त १६५० बस धावत आहेत.







