लोणी काळभोर, ता. 23 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हरिभाऊ मारुती कदम यांची, तर उपाध्यक्षपदी स्वाती प्रकाश काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष अशोक कदम व उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया गुरुवारी (ता. 23) पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी हरिभाऊ कदम व उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत खैरे, संचालक अशोक कदम, प्रकाश कांबळे, आशा खैरे, व्यवस्थापक मारुती सातव उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय. कल्याण (अण्णा) गुजर यांनी या पतसंस्थेची स्थापना सन 1992 साली केली आहे. तर ही पतसंस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना स्वर्गीय ॲड. पी. पी. काळभोर यांनी बहुमुल्य साथ दिली आहे.
पतसंस्था ही नागरिकांना अल्पदरात कर्ज पुरवीत आहे. संस्थेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेमध्ये सध्या 2 कोटी 60 लाख रुपयांच्या सभासदांच्या ठेवी आहेत. तर त्यातील पतसंस्थेने 2 कोटी 13 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेने 65 लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल 7 कोटी 50 लाख रुपये आहे.
याबाबत ”पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ कदम म्हणाले कि, आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन पतसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.







