पुणे: हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी स्लीपर बसमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत असताना हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हडपसर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 9 फेब्रुवारीच्या रात्री घडली. पीडित महिला आणि तिचे पती काचीगुडा (हैदराबाद) येथून रात्री 10 वाजता खासगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसने पुण्याकडे रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास बसमध्ये प्रवास करणाऱ्या निशीत कुमार यशवंत सिंग (वय 47, रा. मीरा रोड, मुंबई) याने महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.
महिला अचानक जागी झाल्यानंतर तिने प्रसंगावधान राखत संबंधित प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. पुण्यात पोहोचल्यानंतर तिने तत्काळ हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पीडितेने दिलेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या 24 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
या घटनेमुळे प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक होत असले तरी खासगी ट्रॅव्हल्समधील सुरक्षाव्यवस्थेबाबत आणि प्रवाशांच्या वर्तनावर नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.







