पुणे: मोफत साडी वाटपाचे आमिष दाखवत दोन चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला गंडवून तब्बल ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी परिसरात घडली. यामध्ये ३२ हजार रुपयांची रोकड, दागिने आणि मोबाइल संच असा ऐवज चोरीला गेला असून, खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला थांबवून ‘मोफत साडी’चं आमिष
खडकी परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय तक्रारदार महिला २० जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास बोपोडी चौकातून खडकीकडे जात होत्या. त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवून सांगितले की, “पालखी आगमनानिमित्त महिलांना एका मंडळाकडून मोफत साडी वाटण्यात येत आहे. तुम्ही श्रीमंत दिसताय, साडी घ्यायची असल्यास तुमचे दागिने, रोकड, मोबाइल पिशवीत ठेवा.”

गोंधळात लांबवला ऐवज
या बोलण्यात त्या महिलेला गुंतवून चोरट्यांनी तिच्या पिशवीतून रोख रक्कम, दागिने आणि मोबाइल संच असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याची तक्रार खडकी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सतर्कतेचे आवाहन
पोलिसांनी सांगितले की, मोफत साडी, धान्य वाटप किंवा पोलीस असल्याचे भासवत फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. विशेषतः ज्येष्ठ महिलांना अशा प्रकारचे आमिष दाखवून लुटले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अशा बतावणींना बळी न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







