पुणे : मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पुरवणारे पवना धरण ७२ टक्के भरले असून, पाण्याची चिंता आता संपली आहे. सलग पावसामुळे पवना धारण काटोकाट भरले असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

धरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातून ४०० क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी सोडण्याची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात पाण्याचा जोर वाढला तर विसर्गाचे प्रमाण आणखी वाढू शकते.
अशापरिस्थितीत पवना नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना नदीच्या पात्रात जाऊ नये असा कडक इशारा दिला असून, शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, पाण्याचे पंप आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे. तसेच सखल भागात राहणाऱ्या लोकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवना पाटबंधारे विभागने एक अहवाल सादर करत सांगितले आहे की, ‘पवना धरण ७२ टक्के भरले असून पाण्याची चिंता संपली आहे. धरणातून सांडव्याद्वारे ४०० क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू राहिल मात्र पाणी हे जीवन असून पाणी जपून वापरावे तर पुढील काळात पाऊस वाढल्यास धरणात येणाऱ्या येव्या नुसार पाणी विसर्ग केला जाईल नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.’







