Digital Arrest Cyber Fraud : पुण्यात दोन ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक उघडकीस आली आहे, ज्यात तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यांच्याकडून आरोपींनी उकळवली. वानवडी येथील ८६ वर्षीय माजी बँक व्यवस्थापक आणि एरंडवणीतील ७० वर्षीय नागरिक यांना आरोपींनी फोनवर संपर्क साधून स्वतःला पोलिस अधिकारी आणि डेटा प्रोटेक्शन संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सादर केले. या फसवणूककारांनी नियोजनबद्ध पद्धतीने मानसिक दबाव आणला; मनी लाँडरिंग, सुप्रीम कोर्ट प्रकरण, अटक आणि बदनामीची भीती दाखवून दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना पैसे पाठवण्यास भाग पाडले.

वानवडीतील माजी बँक व्यवस्थापकाला सांगितले की त्यांच्या नावाने बँक खात्यातून गैरव्यवहार झाला आहे आणि अटक टाळण्यासाठी रक्कम वेगळ्या खात्यांत पाठवावी. दबावाखाली, तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये एक कोटी २७ लाख ५३ हजार रुपये हस्तांतरित केले. दुसऱ्या प्रकरणात, एरंडवणीतील ज्येष्ठ नागरिकाला धमकी देऊन सांगितले की त्यांच्या आधार कार्डचा वापर करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवले जात आहेत आणि त्यांचा सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे; या भीतीतून त्यांनी दोन कोटी १ लाख ९० हजार २४७ रुपये पाठवले.
संपूर्ण घटनाक्रमात आरोपींनी पीडितांना कुटुंबाशी बोलण्यापासूनही रोखले, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काही दिवसांच्या काळात मुलींशी संवाद साधला नाही. मुलींनी वडिलांकडे लक्ष दिल्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघड झाला.







