पुणे: बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या अनेकांमध्ये, विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये ‘लोहाची’ (Iron Deficiency) कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शरीरात लोह कमी झाले की, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते, ज्याला आपण ‘ॲनिमिया’ म्हणतो. यामुळे केवळ थकवाच येत नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या केस, त्वचा आणि मानसिक आरोग्यावरही होतो.

लोहाची कमतरता आहे हे कसं ओळखावं?
-
विनाकारण सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
-
पायऱ्या चढताना किंवा चालताना धाप लागणे.
-
हात आणि पाय थंड पडणे.
-
केस गळणे आणि नखे कमकुवत होणे.
-
उठताना डोळ्यांसमोर अंधारी येणे.
नैसर्गिकरित्या लोह वाढवणारे ‘सुपरफूड्स’
1.दररोज मूठभर शेंगदाणे आणि गुळाचा खडा खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वेगाने वाढते. हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय मानला जातो.
2. हिरव्या पालेभाज्यांचा राजा ‘पालक’ पालक, मेथी आणि शेपू यांसारख्या भाज्यांमध्ये लोहाचा खजिना असतो. शक्य असल्यास या भाज्या लोखंडी कढईत बनवाव्यात, ज्यामुळे लोहाचे प्रमाण दुप्पट होते.
3. बीट रक्तातील लाल पेशी वाढवण्यास मदत करते, तर डाळिंबामुळे लोहाचे शोषण चांगले होते. दररोज एक ग्लास बीट-गाजर ज्यूस रक्ताची कमतरता दूर करू शकतो.
4. रात्री भिजवलेले 5-6 काळे मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने लोहाची पातळी झपाट्याने वाढते. खजूर हा देखील लोहाचा नैसर्गिक स्रोत आहे.
नुसते लोहयुक्त पदार्थ खाऊन चालत नाही, तर ते शरीरात शोषले जाणे (Absorption) महत्त्वाचे असते. यासाठी अन्नासोबत व्हिटॅमिन C (उदा. लिंबू, संत्री किंवा आवळा) घेणे आवश्यक आहे. जेवताना जेवणावर लिंबू पिळल्यास अन्नातील लोह शरीराला लवकर मिळते.







