Crime News : कामगार महिलेकडून उसाचे वाडे विकत घेतल्याच्या कारणावरून सावत्र चुलत्याच्या कुटुंबाकडून पती-पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी सांडस (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता.2) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी कंद पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल सुखदेव हरपळे (वय 30), स्वप्नील सुखदेव हरपळे (वय 35) किरण ज्ञानेश्वर हरपळे (वय-27) व सुखदेव लक्ष्मण हरपले (वय-57, सर्व रा. हरपळे वस्ती, पिंपरी सांडस ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ रामभाऊ हरपळे (वय-42) यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ हरपळे व आरोपी हे सावत्र चुलते, त्यांची मुले असल्याने एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना वडीलोपार्जीत शेतजमीन ही घराच्या शेजारीच आहे. फिर्यादी नवनाथ हरपळे यांची पत्नी सारीका यांनी सुनिल सुखदेव हरपळे यांच्याचेकडील कामगार महिलेकडून उसाचे वाडे विकत घेतले होते.
दरम्यान, आमचे वाडे का विकत घेता असे म्हणून सुनिल हरपाळे यांनी नवनाथ हरपळे यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आणि म्हणाले की, “या रे बाहेर याला माज आला आहे . याचा आज माज जिरवून टाकू” असे म्हणाल्यानंतर घरामधुन स्वप्नील हरपळे हा लाकडी दांडके घेऊन, किरण हरपळे हातात उस तोडणीचा कोयात घेऊन व सुखदेव हरपळे असे सगळे धावत फिर्यादी नवनाथ हरपळे यांच्या अंगावर आले.
स्वप्नील हरपळे याने नवनाथ हरपळे यांना लाकडी दांडक्याने, सुनिल हरपळे याने शेतातील ऊसाने व सुखदेव हरपळे याने लाथा बुक्यांनी मारहाण तर किरण हरपळेने शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी नवनाथ हरपळे यांची पत्नी सारीका या भांडणे सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागल्या तेव्हा किरण हरपळे याने त्यांना हाताने कानाखाली मारून शिवीगाळ केली.
याप्रकरणी नवनाथ हरपळे यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 131, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी कंद पोलीस करत आहेत. (pune crime)







