Crime : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई 9 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. (Crime)

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांचं पथक वारजे व उत्तमनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेली ही अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरीच असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीनंतर गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने तात्काळ सापळा रचला आणि संबंधित विधीसंघर्षित मुलीला ताब्यात घेतलं.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी तिने तिच्या काही मित्रांच्या मदतीने एका 17 वर्षीय मुलाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याला खेड शिवापूर परिसरात नेण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या संपूर्ण घटनेत तिचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे.
या कारणास्तव पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.







