सागर जगदाळे, भिगवण

Bhigwan : संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच सध्या ठीकठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत आदी पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 17) भेट घेऊन पत्राद्वारे केल्या आहेत. या भेटी प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. (Bhigwan)
संत तुकाराम महाराज पालखी (राष्ट्रीय महामार्ग 965 जी ) मार्ग श्री क्षेत्र देहू ते पंढरपूरचे दरम्यान असलेल्या भवानीनगर-इंदापूर-सराटी दरम्यानचे सुमारे 70 कि.मी. लांबीचे रस्त्याचे काम गेली अनेक वर्षांपासून कासवगतीने चालू आहे. सदरच्या दर्जाहीन कामांमुळे सध्या प्रवासी व जनतेमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष निर्माण झालेला आहे. पालखी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, त्यामुळे झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी व दर्जेदार काम करून घेण्यात यावे. सध्या पालखी मार्गाची अपूर्ण असलेली व बंद पडलेली असंख्य कामे उदा. निमगाव केतकी तसेच बावडा बाह्यवळण रस्ता, वकीलवस्ती येथील भुयारी मार्ग, वडापुरी येथील उड्डाणपूल तसेच तरंगवाडी, लासुर्णे, भवानीनगर-सणसर आदी ठिकाणचे रस्ते तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
तसेच इस्टिमेट प्रमाणे वृक्षारोपण, झाडे, रस्ता दुभाजकांची कामे, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक आदी कामे झालेली नाहीत. तसेच अनेक ठिकाणी गटारीची कामे झालेली नसल्याने अथवा अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी इस्टिमेट प्रमाणे कामे पूर्ण करण्यात यावीत. चालू वर्षी जुलै महिन्यात पालखी सोहळा पंढरपुरकडे जाताना वारकऱ्यांना अनेक ठिकाणी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. उदा.सुरवड येथे वारकऱ्यांमध्ये चंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालखी रथ जाणारे गावागावातील सेवा रस्ते हे रुंद व दर्जेदार करण्यात यावेत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये केली आहे . (Bhigwan)
तसेच सध्या पालखी मार्गाची कामे अपूर्ण असताना, टोल वसुली चालु करण्यात आली आहे. पालखी मार्गाची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत. त्यामुळे कराराप्रमाणे पालखी मार्गाची कामे पूर्ण झालेनंतरच टोल चालू करण्यात जावा, तोपर्यंत टोल वसुली करण्यात येऊ नये. पालखी मार्गाच्या अनेक अपूर्ण कामांमुळे आजपर्यंत ठिक-ठिकाणी अनेक अपघात झाले आहे व सध्याही घडत आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, असे या पत्रात नमूद करून वरील सर्व मागण्यांबाबत चौकशीचे आदेश द्यावेत तसेच आगामी पालखी सोहळा येण्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत, यासाठी आपण बैठक घेऊन, कामे दर्जेदार व पुर्ण करणे बाबत आदेश देण्यात यावेत, अशी विनंती या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटील यांनी नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जांच्या कामांची चौकशी करून, अपूर्ण कामे पूर्ण करणे व पत्रातील इतर मागण्या संदर्भात तातडीने संबंधितांना आदेश देण्यात येतील, असे ना.नितीन गडकरी यांनी या भेटीत नमूद केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.






