Ajit Pawar: पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणात दोषी ठरल्यानंतर माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर आपले मंत्रिपद सोडावे लागले. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील क्रीडा मंत्रीपद काढून घेण्यात आले. हे खाते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. (Ajit Pawar)

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच क्रीडा खाते सोडणार आहेत. हे खाते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या एका आमदाराला दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे रिक्त झालेले मंत्रिपद मराठवाडा विभागाला देण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत नवघरे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नवघरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, तर मागील दोन दशकांनंतर वसमत तालुक्याला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही या निर्णयाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी एका सभेत चंद्रकांत नवघरे यांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी इच्छुक आमदारांची संख्या जास्त असल्याने नवघरे यांना संधी मिळाली नव्हती. आता परिस्थिती बदलली असून त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळत आहेत.
या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात नेमकी कोणती खाती आणि कोणत्या आमदाराला दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.






