मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ (Prithviraj Chavan) उडवणारे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या महिन्यात एक मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. आयोगाने निर्माण केलेला गोंधळ हा राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. (Breaking News)

पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे. अमेरिकेतील उद्योगपती जेफ्री अमस्टिन याच्याशी संबंधित प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला. अमस्टिनने अनेक बेकायदेशीर कारवाया केल्या असून त्यात राजकारण्यांना अडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अमेरिकेतील अनेक मोठ्या नेत्यांची नावे पुढे आली आहेत आणि यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे. त्यामुळे ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो असे त्यांनी सांगितले.
चव्हाण यांच्या मते, अमेरिकेची संसद ट्रम्प यांच्यावर दडपण आणत आहे. या प्रकरणातील सुमारे 10 हजार कागदपत्रे संसदेने ताब्यात घेतली आहेत आणि ही कागदपत्रे पुढील काही दिवसांत सार्वजनिक होऊ शकतात. सुब्रमण्यम स्वामी यांनीही या प्रकरणाचा उल्लेख केला असून त्यांच्याजवळही काही माहिती पोहोचू शकते असे चव्हाण यांनी सांगितले.
या विषयामुळे आज संसदेतही गदारोळ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शेवटी ते म्हणाले की त्यांनी फक्त मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असे सांगितले आणि त्याचा अर्थ लोकांनी स्वतः लावावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात नवे अंदाज आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.







