मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate Resignation) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या एका जुन्या सदनिका प्रकरणात न्यायालयाने त्यांना दिलेली 2 वर्षांची कैद कायम ठेवल्यामुळे त्यांना आता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कोकाटे यांच्यावर 1995-96 मध्ये खोट्या कागदपत्रांचा वापर करून सरकारी सदनिका हडपल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या कायदेशीर पेचामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असून आज त्यांची अँजिओग्राफी केली जाऊ शकते.

दरम्यान, अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. कोकाटे यांच्याकडे असलेले खाते आता कोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवार यांनी सध्या ही खाती स्वतःकडे ठेवली असली तरी, आगामी काळात अनिल पाटील, धनंजय मुंडे किंवा संजय बनसोडे यांच्यापैकी कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच सुनील शेळके किंवा संग्राम जगताप यांसारख्या नवीन नेत्यांनाही मंत्रीमंडळात संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने नवीन मंत्र्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
कोकाटे यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली असून, यावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांचे कृषी खाते आधीच काढून घेण्यात आले होते. आता या सदनिका प्रकरणामुळे त्यांच्यासमोरील संकट अधिकच गडद झाले आहे. दरम्यान, आता राज्यात पुढे काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







